Pandharpur Vitthal Temple Will be closed from December 21 to 31
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पाद्यपूजेमूळे श्री विठ्ठलाचे दर्शन थांबू नये. नाताळ, एकादशी तसेच वर्षअखेरच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. या भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी विठ्ठल-रुक्मिणीमातेची पाद्यपूजा सेवा दि. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर कालावधीत बंद करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून देण्यात आली.
डिसेंबर महिन्यात येणारा नाताळ, महिन्याची एकादशी तसेच नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तसेच, इतर सुट्ट्यांमुळे पंढरपूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असणार आहे.
या भाविकांना विनाविलंब दर्शन घेता यावे. तसेच, मंदिरातील व्यवस्थापन सुरळीत ठेवून भाविकांनाही याचा त्रास होऊ नये, म्हणून पाद्यपूजा तात्पुरत्या स्वरूपात दि. 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घेतला आहे.
पाद्यपूजेमूळे विलंब
पाद्यपूजा ही मंदिरातील खास सेवांपैकी एक असून, पाच भाविकांच्या गटासाठी 5 हजार रुपये देणगी आकारून ही पूजा केली जाते. मागील काही दिवसांपासून पाद्यपूजेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असल्याने गर्दीचाही ओघ वाढत आहे. भाविकांना पाद्यपूजेमुळे मुख्य दर्शन रांगेत विलंब होत होता.
गर्दीचे व्यवस्थापन करताना अडचणी निर्माण होत होत्या. भाविकांना मुख दर्शन, पदस्पर्श दर्शन सुलभ व सुरळीत व्हावे, या उद्देशाने पाद्यपूजा डिसेंबरअखेरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, मंदिर समितीतर्फे नित्य राजोपचार सुरूच ठेवण्यात येत आहेत.