सोलापूर

Pandharpur Vitthal temple: विठ्ठल मंदिर दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या

भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट : माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली पोलखोल; मंदिर समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरात असलेल्या दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात चक्क दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे तसेच गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी या प्रकाराची पोलखोल करत मंदिर समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मंदिरातील स्वच्छतेचे काम खासगी बीव्हीजी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे; मात्र मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारच्या वस्तू आढळून येत असल्याने संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चुकीच्या कृत्यांना मूक संमती देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता भाविकांकडून होत आहे.

दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात शहरातील तळीरामांचा वावर वाढल्याचे चित्र समोर येत असून, यामुळे महिला भाविकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंढरपूरसारख्या पवित्र धार्मिक स्थळी अशा घटना घडत असतील, तर प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली आहे.

बीव्हीजीचे टेंडर रद्द करण्याची मागणी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून बीव्हीजी कंपनीचे टेंडर रद्द करावे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था आणि स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT