Pandharpur Vitthal Rukmini Temple Pudhari
सोलापूर

Pandharpur Vitthal Temple: आजपासून विठ्ठल मंदिर तीन दिवस बंद

'श्रीं'च्या मूर्तीवर दि. २३ ते २५ दरम्यान वज्रलेप प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचे जतन व संवर्धन करण्याच्या कामासाठी तीन दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुखदर्शनासह पदस्पर्श दर्शनही बंद राहणार आहे. मंगळवारी रात्री शेजारती झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी, मंदिर समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत काम करण्यात येणार आहे.

दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती जतन व संवर्धनासाठी दि.२३ ते २५ दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. काम पूर्ण होताच दि. २६ सप्टेंबरपासून दर्शन पूर्ववत सुरू राहील. वारकरी, भाविक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले आहे.

पाचव्यांदा वज्रलेप

यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे मूर्तींच्या नियमित देखभालीच्या अनुषंगाने मूर्तीला संरक्षक आवरण (वज्रलेप) देण्यात येणार आहे. ही पाचवी प्रक्रिया असणार आहे. याकरीता तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT