पंढरपूर : दिनांक २३ व २४ जून या दोन दिवसांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात विविध तज्ज्ञ, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. त्यानुसार मूर्ती संवर्धनाचे काम होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
वारकरी, भाविक व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले. यापूर्वी सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते.