पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या पादुकांवर गुलाल, बुक्क्याची उधळण करीत शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला उत्साहात पार पडला. या उत्सवानंतर आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजाकडून महाद्वारकाला करण्याची परंपरा आहे.
गोपाळपूरचा काला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या पंढरीचा निरोप घेतात. यानंतर स्थानिकांचा उत्सव अर्थात महाद्वार काला करण्याची परंपरा गेल्या चारशे वर्षांहून अधिक काळापासून आहे. येथील हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दर्शन देऊन आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद रूपाने दिल्या होत्या. त्यानंतर हरिदासांच्या ११ पिढ्यांपासून हा उत्सव सुरू आहे. परंपरेनुसार संत नामदेव महाराजांच्या वंशजाची दिंडी हरिदास यांच्या घरी आल्यानंतर श्री विठ्ठलाच्या पादुका मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पुजाऱ्यांनी बांधल्या.
पारंपरिक मार्गाने काल्याची दिंडी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपात पोहोचली. त्याठिकाणी पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी पादुकांवर लाह्याची उधळण केली. मंदिरातून गोपाळ काल्याची दिंडी महाद्वार घाटावरून चंद्रभागा नदीकडे निघते. परंतु, यंदा चंद्रभागा नदीला पूर आल्यामुळे घाटापासूनच गोपाळ काल्याची दिंडी फिरविण्यात आला. तेथून माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे परंपरेप्रमाणे दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी रस्त्यावर शेकडो भाविकांनी काल्याचे दर्शन घेतले. गुलाल, बुक्का व फुलांची उधळण यावेळी करण्यात आली.