Pandharpur Vitthal Mandir 
सोलापूर

Pandharpur Vitthal Mandir : स्पर्श दर्शन वाढल्याने विठ्ठल मूर्तीच्या चरणाची होतेय झीज

पाचव्यांदा करावा लागणार वज्रलेप; पुरातत्त्व विभागाचा अहवाल विधी व न्याय विभागाकडे सादर

पुढारी वृत्तसेवा

सुरेश गायकवाड

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो वैष्णवांचा विधाता असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. वर्षभरातील मोठ्या चार यात्रांना मिळून सव्वा कोटीहून अधिक भाविक येतात. विठ्ठल मूर्ती ही स्वयंभू समजली जाते. लाखो भाविक विठ्ठल- रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन घेतात. विठ्ठल मूर्तीच्या चरणांना स्पर्श केल्याने मूर्तीची झीज होत आहे. याबाबत फेब्रुवारी 2025 मध्ये पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी विठ्ठल मूर्तीची सखोल पाहणी केली. यानंतर विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला याबाबतचा अहवाल दिला आहे.

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे भाविकांना चरणस्पर्श दर्शन घेता येते. दर वर्षभरातील चार मोठ्या यात्रांमध्ये येणारे एकूण भाविक पाहता वर्षाकाठी सुमारे सव्वा कोटीहून अधिक भाविक चरणदर्शन घेतात. परिणामी, चरणाची होणारी झीज थांबवण्यासाठी एकमेव उपाय म्हणून वज्रलेप (ईपोक्सी लेप) करण्यात येतो. मूर्तीच्या चरणावर एकप्रकारे लेपन करण्यात येते. हे लेपन पुरातत्त्व विभागाचा निरीक्षणाखाली करण्यात येते. विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यास लेपन करण्यात येते. विठ्ठलाच्या मूर्तीवर सर्वप्रथम 1988 मध्ये लेपण (वज्रलेप) करण्यात आले होते. सद्या मुर्तीच्या चरणाची झीज होत असल्याने वज्रलेप करावा लागणार आहे. त्यामुळे करण्यात येणारा वज्रलेप हा पाचवा असणार आहे.

दर पाच वर्षानी श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणावर वज्रलेप करण्याची आवश्यकता असल्याचे पुरातत्व विभागाने सुचविलेले आहे. सद्या श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होऊ लागली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे. तर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या अहवालास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून मंजुरी आल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित वज्रलेप करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात येते.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. शनिवार व रविवार विकेंडला पंढरपुरात यात्रा भरल्यासारखी गर्दी असते. तासनतास भाविक दर्शन रांगेत उभारुन विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन घेतात. यातून मूर्तीची झीज होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापुर्वी चार वेळा वज्रलेप करण्यात आला-

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल मूर्तीवर सर्वप्रथम 1988 मध्ये लेपण करण्यात आले. यानंतर 2005 मध्ये लेपन करण्यात आले. तर पुन्हा भाविकांची गर्दी वाढल्याने मुर्तीची झीज होऊ लागल्याने 2012 आणि कोरोना काळात जुलै 2020 मध्ये मूर्ती जतन आणि संवर्धनासाठी लेपन करण्यात आले होते.

भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत सन 2020 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर वज्रलेपाची संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली आहे. सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित स्थितीत आहेत. तथापि, भविष्यात मूर्तींची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये. या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत.
गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT