पंढरपूर : ‘जाता पंढरीशी सुख लागे जीवा’... असे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांच्या हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमली. कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला सुमारे सात लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली. मठ, मंदिर, संस्थाने, भक्तिसागरातील तंबू, राहुट्यांमधून भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले.
भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळसदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तितकीच गर्दी रांगेत होती. दर्शन रांगेतील 14 दर्शन शेडमध्ये एकादशी दिवशी सुमारे दीड लाखावर भाविक प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग पत्रा शेडच्या बाहेर पडून गोपाळपूर रोडवर सकाळी दाखल झाली होती. रांगेतील भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे 10 ते 12 तासांचा अवधी लागत आहे.
कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांची पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी झाली. स्नानानंतर दर्शन घेऊन भाविक प्रसाद, कुंकू, बुक्का, अगरबत्ती खरेदीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येते. मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली. कार्तिकी यात्रेत चोऱ्या रोखण्यासाठी माऊली स्कॉड, 12 ठिकाणी वॉच टॉवर, 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. सुमारे 3 हजार 57 पोलिस अधिकारी व कर्मचारी यात्रेसाठी तैनात करण्यात आलेे आहेत. पाच ठिकाणी आपत्कालीन विभाग कार्यरत ठेवला होता. भाविकांना अडचण आल्यास त्वरित संपर्क करता येत आहे.
आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत आहेत. कार्तिकी यात्रेकरिता यंदा विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. एसटी बसेस भाविकांच्या सेवेकरिता धावत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत योजना असल्यामुळे महिला भाविकांची संख्या जास्त दिसून येत आहे. शहरात व शहराबाहेर 16 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.