पंढरपूर : नीरा उजवा कालवा पाण्यातून पंढरपूर तालुक्यातील सोनके तलाव १०० टक्के भरून घेण्यात यावा. या मागणीसाठी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ३१ ऑगस्टपासून सोनके येथील इनलेट गेटच्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये समाधान फाटे, तानाजी गोफणे, दिगंबर वाघमारे व संतोष गायकवाड यांचा समावेश आहे.
नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर ही धरणे १०० टक्के भरल्यानंतर दरवेळी सोनके तलाव नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडून १०० टक्के भरून घेतला जातो. यंदा मात्र, पाऊस नसल्याने कालव्याचे पाणी उभ्या पिकांना देण्यात येत असून, दीड महिन्यानंतरही तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे तलाव कोरडा पडला आहे. या तलावावर अवलंबून असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, पळशी, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, शेळवे, खेड भाळवणी, शिरढोण या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तलाव १०० टक्के भरून न घेतल्यास ९ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे तलाव १०० टक्के भरून घेण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
आंदोलनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जि. प. सदस्या मयुरी बागल यांचे प्रतिनिधी संतोष बागल यांनी उपोषणस्थळी भेट देत लोकप्रतिनिधींशी भ्रमणध्वनीवरून तलाव पाणी सोडण्यात यावे, याबाबत चर्चा केली. पाटबंधारे विभाग पंढरपूरचे उपविभागीय अभियंता राजेंद्र धोत्रे, शाखा अभियंता अभिजित नवले यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून, त्यांच्या मागण्या वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगितले. यावेळी लिंगदेव ढवळे, अतुल गायकवाड, पंडित बागल, नितीन बागल, सचिन भोसले, गणपत मोरे, आबासाहेब बागल, प्रकाश बागल, निलेश भोसले, शिवाजी पोरे, वसंत गिड्डे, ज्ञानेश्वर डोळस, प्रदीप भोसले, मल्हारी बनसोडे, पांडुरंग शिंदे, सुभाष गोडसे आदी उपस्थित होते.