पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील 11 गावांसाठी उपयुक्त असणाऱ्या तिसंगी सोनके तलावात सध्या 64 टक्के पाणीसाठा आहे. या तलावातून उन्हाळी हंगामात उभ्या पिकांसाठी दोन पाणी पाळ्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिली पाणी पाळी ही 22 मार्च पासून तर दुसरी पाणी पाळी ही 7 मे पासून देण्यात येणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेती पिकांना याचा फायदा होणार आहे.
येथील शासकीय विश्रामगृह येथे तिसंगी सोनके तलाव मध्यम प्रकल्प पाणी नियोजनासंदर्भात आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, नीरा उजवा कालवा विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे, उपविभागीय अभियंता राजेंद्र धोत्रे, शाखा अभियंता अभिजीत नवले, विशाल काळे व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 20 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. यामध्ये तलावातील पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळी हंगामात दोन पाणीपाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी जमा करीत, पाणी मागणी अर्ज द्यावेत. पाणी नियोजनात सहभाग नोंदवावा असे आवाहन आ. आवताडे यांनी केले. उन्हाळी हंगामात पाण्याचे काटेकोर नियोजन व्हावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे नियोजनावर परिणाम होत असल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी आर.पी. मोरे, राजेंद्र धोत्रे यांनी पाणीपातळी व पाणी नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. पाटबंधारे विभागाने आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी जमा करून घेत असताना लवचिकता ठेवावी, सिंचन सुरळीत पार पडावे यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी नियमित तलाव व कालवा भागात टेहळणी करावी,अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी गणेश बागल, मोहन बागल, अतुल गायकवाड, सुधाकर फाटे, महादेव गायकवाड, संतोष पोरे, राजेंद्र बागल, आनंद बागल उपस्थित होते.