पंढरपूर : पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळुमाफियांनी चक्क चंद्रभागेचे पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या वाळवंटातील वाळू चोरी करता यावी, यासाठी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकले आहेत.
गणेश अंकुशराव यांनी विष्णुपदावरील बंधाऱ्याची पाहणी केली असता येथील दरवाजे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी काढून फेकले असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. सध्या अधिक मास सुरू असून त्यानिमित्ताने पंढरपुरात दर्शनासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत, परंतु बंधाऱ्याचे गेट काढल्याने नदीपात्रात साठलेले पाणी वाहून जात आहे.
परिणामी वारकरी भाविकांच्या स्नानाची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे शासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी व यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.