सलग सुट्ट्यांमुळे विठ्ठल दर्शनासाठी गर्दी 
सोलापूर

Pandharpur News : सलग सुट्ट्यांमुळे विठ्ठल दर्शनासाठी गर्दी

ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी आणि वीकेंडमुळे भाविक पंढरीत दाखल

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : शुक्रवारी ईद-ए-मिलाद, शनिवारी अनंत चतुर्दशी, तसेच रविवार विकेंडच्या सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे लाखो भाविक, वारकर्‍यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागातीरावरील सारडा भवनच्या पुढे विप्रदत्त घाटाच्या पुढे पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. गणेशोत्सव सुरू असल्याने भाविकांच्या संख्येत आणखी भर पडत आहे. दर्शन रांगेत हजारो भाविक दाखल झाले आहेत.

सलग सुट्ट्यामुळे लाखो भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने दर्शन रांंग वॉटरप्रुफ उभारण्यात आलेली आहे. परंतु दर्शन रांगेत पावसाचे पाणी साचत असल्याने व खाली मॅट नसल्याने भाविकांना घाण पाणी, काही ठिकाणी चिखल तुडवत जावे लागत आहे. एका बाजुला पाऊस वाढत आहे तर दुसर्‍या बाजुला दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. चंद्रभागा स्नानासाठीदेखील भाविकांची गर्दी होत आहे. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून पिण्याचे शुध्द पाणी, वॉटरपप्रुफ दर्शन शेड उभारुन सेवा देण्यात आलेली आहे. मात्र दर्शन रांगेत पाऊस आला की अंथरलेले मॅट भिजत आहे. तर काही ठिकाणी मॅटच टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे भाविकांंना चिखल, घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

आज शुक्रवारी ईद-ए-मिलाद, शनिवारी अनंत चतुर्दशी तसेच रविवार विकेंड असल्याने सलग तीन दिवस सुट्टी आहे. यामुळे राज्यभरातील व परराज्यातूनही हजारो भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत, दाखल होत आहेत. भाविकांच्या वाहनांचीदेखील पार्किंग हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे गजानन महाराज मठाशेजारी रस्त्यावर वाहने उभा करावी लागत आहेत. दरम्यान, पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी आलेले भाविक चंद्रभागा नदीत स्नान करण्यास प्राधान्य देत आहेत. मुख दर्शन, कळस दर्शन तसेच पदस्पर्श दर्शन घेऊन भाविक धन्यता मानत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढत असल्याने बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT