सोलापूर

Sunetra Pawar: पंढरपुरात चार हजार कोटींच्या आराखड्यातून विकासकामे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार : मंचर भक्तनिवासाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याला राज्यस्तरीय शिखर समितीने मान्यता दिली आहे. सुमारे ४,००० कोटींच्या या आराखड्यातून पुरातन मंदिर-मठांचे जतन, भव्य कॉरिडॉर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाट सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुल, रस्ते, पूल व पालखी तळांचा विकास होणार आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे-पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. कानोबा महाराज मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाली हे भाग्यच. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे आपुले, तोचि साधू ओळखावा” या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत त्या म्हणाल्या, “ऊन-पावसाची पर्वा न करता पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. दिलीपराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व वारकरी मंडळांनी ही वास्तू उभारली हे कौतुकास्पद आहे. मंचरला पांडवकालीन बारव, तपेश्वर भूमीची आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. संत तुकाराम महाराजांनी ‘मंचरी’ हा हस्तलिखित ग्रंथ मंचर येथे लिहिला, त्यात ५३७ अभंग आहेत. ही मंचरकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

कार्यक्रमास पंढरपूर व मंचर नगरपालिकेचे नगरसेवक, सेवा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष सुभाष थोरात, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, शासकीय अधिकारी, पत्रकार व हजारो वारकरी उपस्थित होते.

अजितदादांना पंढरपूर जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ बनवायचे होते. पालखी महामार्ग हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांची अनेक स्वप्ने पूर्ण झाली, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला हक्काचा निवारा मिळावा यासाठी ही सुसज्ज धर्मशाळा उपयोगी ठरेल. ही इमारत भक्ती व सेवेचे केंद्र बनेल. मंडळाचे संस्थापक ह.भ.प. मारुती धोंडेबा मोर्डे ऊर्फ अण्णा गुरुजींनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. ‘पूर्ण केला मनोरथ’ या उक्तीप्रमाणे आंबेगाव-मंचरच्या ग्रामस्थांचे पंढरपुरात हक्काचे घर झाले आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. गोवर्धन समुदायाचे देवेंद्र शहा यांच्यासह अनेक दानशूरांनी प्रकल्पासाठी मोठी मदत केली, त्यांचे ऋण उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT