सोलापूर

Rohit Pawar Protest: आ. रोहित पवार यांचे आंदोलन सुरूच; तब्येत बिघडली

सलाईन लावण्यास नकार; सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर नामदेव पायरी येथे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : विना अट दोन लाखांपर्यंत सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी आ. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस होता. तरीदेखील सरकारकडून मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही. त्यातच आ. रोहित पवार यांची तब्येत बिघडली आहे. तरीही सोमवार (दि. १५) पासून विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी आंदोलनकर्ते आ. रोहित पवार यांची बीपी, शुगर कमी झाली आहे. त्यांना अशक्तपणा आला असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, सरकारकडून मंत्री गिरीश महाजन हे मध्यस्थी करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आल्यानंतरच सलाईन लावून घेऊ, असे आ. पवार यांनी सांगितले.

शुक्रवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अन्नत्याग आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकारने कोणत्याही अटी शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी केली. या आंदोलनाच्या बाजूने पूर्ण ताकदीने उभे राहण्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला. तसेच, शेकापचे नेते भाई जयंत पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. सुनील भुसारा, भावनाताई घाणेकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.

कुटुंब झाले भावुक

आंदोलनाला तीन दिवस झाले असून, आ. रोहित पवार यांची तब्येत बिघडत आहे. आंदोलनस्थळी पहिल्या दिवसापासूनच आ. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे ठाण मांडून बसले आहेत. तर रविवारी आ. रोहित पवार यांचे कुटुंब आंदोलनात दाखल झाले आहे. वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार, मुलगा शिवांश आणि आनंदिता हे आ. पवार यांना पाहून भावुक झाले. सरकारने त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे.

संपूर्ण कर्ज माफी करा : जरांगे

खर तर सरकारने या आंदोलनाची वेळच येऊ द्यायला नको होती. मात्र, सरकार शेतकरी म्हटले की, द्यायला तयार होत नाही. नियम अटी लादून बेजार करत आहे. माझे म्हणणे आहे की, एकदाचीच संपूर्ण कर्जमाफी करा, अशी मागणी सरकारकडे मनोज जरांगे यांनी केली आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांनी मोदी यांना एक फोन केला तर झटक्यात कर्जमाफी होईल की, आजोबांना फोन करायला लावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT