पंढरपूर : रविवारी सकाळी पंढरपूर येथे इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे मार्गक्रमण करणार्या चंद्रभागा नदीचा विसर्ग कमी होऊ लागला आहे. उजनी धरणातून करण्यात येणारा विसर्ग निम्म्याने कमी केला आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका सध्यातरी टळला असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांनी तसेच पंढरपूर येथील व्यास नारायण झोपडपट्टी येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
नीरा व भीमा खोर्यात सुरू असलेला पाऊस कमी झाला आहे. यामुळे धरणात येणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी भीमा नदीत सोडण्यात येणारा 1 लाखाचा विसर्ग रविवारी कमी करुन तो 40 हजारावर आणला आहे. तर वीर धरणातून करण्यात येणारा 8 हजाराचा विसर्ग कमी करुन तो 3200 करण्यात आला आहे. सद्या दोन्ही धरणातून 43 हजार 200 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.
शनिवारी रात्री पंढरपूर येथे सुरु असलेला 90 हजारांचा विसर्ग कमी होऊन 60 हजारांवर आला आहे. त्यामुळे सध्यातरी पंढरपूर येथील संभाव्य पुराचा धोका टळला आहे. असे असले तरी पंढरपूर येथे भीमा (चंद्रभागा) इशारा पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत. महाद्वार घाटाच्या पायर्यांवर पाणी आहे. मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे. तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक गेली दोन आठवड्यांपासून बंदच आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पंढरपूर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आहे. हे पाणी थेट भीमा नदीला मिळत आहे. परंतु, उजनी व वीर धरणातून विसर्ग कमी केल्यामुळे सकाळपासून नदीपात्रातील पाणी कमी होऊ लागले आहे. सध्यातरी आणखी जादा विसर्ग वाढला जाणार नाही. त्यामुळे चंद्रभागा नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्याची भीती कमी झाली आहे.