पंढरपूर : कॉरिडॉरसाठी भूसंपादनाच्या ठरावाविरुद्ध बुधवारी मोर्चा काढण्यात आला.  Pudhari Photo
सोलापूर

Pandharpur Corridor: कॉरिडॉरसाठी भूसंपादनाच्या ठरावाविरुद्ध पंढरपुरात मोर्चा

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत भूसंपादनाचा विषय तहकूब

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : कॉरिडॉरसंदर्भात भूसंपादनाचा ठराव नगरपरिषदेच्या बुधवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार होता. तो घेऊ नये यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने नगरपरिषदेवर मोर्चा काढला. दरम्यान, मोर्चेकऱ्यांच्या भावनाची दखल घेत नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी भूसंपादनाचा विषय तहकूब केल्याचे जाहीर केले.

कॉरिडॉर बाधितांनी बुधवारी सकाळी नामदेव पायरीपासून कॉरिडॉर बाधित भागातून मोर्चा काढला. सकाळी दहा वाजता मोर्चा नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर आला. कॉरिडॉर रद्द करा, प्राचीन पवित्र पंढरपूरचा विध्वंस नको, कॉरिडॉर सरकारी जागांवरच करा, अशा घोषणांनी यावेळी मोर्चेकऱ्यांनी परिसर दुमदुमून सोडला. या मोर्चामध्ये बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, उपाध्यक्ष माऊली महाराज गुरव, गणेश लंके, वैभव बडवे, वीर महाराज, व्यंकटेश गलगलकर, बाळासाहेब डिंगरे, सुलभा वट्टमवार, आगरवाल, डॉ. प्राजक्ता बेणारे, महिलांचा मोठा सहभाग होता.

भूसंपादनाचा विषय तहकूब

नगरपरिषदेच्या सभेत कॉरिडॉर भूसंपादनाचा विषय ऐनवेळी घेतला. कॉरिडॉरबाबत नगरध्यक्ष व चाळीस नगरसेवक यापैकी कोणालाही विश्वासात घेतले नाही. धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी कॉरिडॉर भूसंपादनाला विरोध दर्शवत विषय तहकूब ठेवण्यास सहमती दर्शवल्याने नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी भूसंपादनाचा विषय तहकूब केला.

पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचा शासनाने पसरवलेला भ्रमाचा भोपळा आज फुटला. कॉरिडॉरला केवळ दोन-चार लोकांचा विरोध राहिला आहे, असे संतापजनक विधान पालकमंत्र्यांनी केले होते. त्याला आज बचाव समितीच्या मोर्चातून सणसणीत चपराक मिळाली.
- अभयसिंह इचगावकर अध्यक्ष, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT