पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी. नागरिकांची आणि येणाऱ्या भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन बसवण्यात आलेले सीसीटीव्ही यंत्रणा कमजोर झालेली आहे. निम्म्याहून अधिक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. हे सर्व कॅमेरे सुरू करण्यात यावेत, अशी सूचना नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे. नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी सोमवारी शहरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी केली.
पंढरपूर शहरातील वाढती गुन्हेगारी, भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच्या तक्रारी, वाढते अपघात आणि त्यातून पळून जाणारी वाहने याच्या तक्रारी वाढत होत्या. या सर्व तक्रारीनंतर सुमारे 1 कोटी रूपयांहून अधिक निधी खर्चून शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभा करण्यात आलेली आहे. शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर, चौकात, शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यावर, मंदिर परिसर आणि बसस्थानक, रेल्वे स्टेशन मार्ग आदी ठिकाणी हे अत्याधुनिक 157 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. रात्रीच्या अंधारातही घटना टिपतील, असे कॅमेरे असल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे.
सुमारे दोन वर्षांपासून ही यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. शहर पोलिस ठाण्यासमोर असलेल्या पोलिस संकुल इमारतीत नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. या ठिकाणाहून संपूर्ण शहरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. मात्र मागील महिन्यांपासून ही यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे.
अनेक अपघात करून वाहने पसार झालेली आहेत. खुनाच्या गंभीर प्रकरणात, अनेक चोरीच्या घटनांमध्ये या यंत्रणेचा काहीच उपयोग झालेला नाही. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ही सीसीटीव्ही यंत्रणेच्या कुचकामी ठरल्याबद्दल विरोधकांकडून टीका करण्यात आलेली होती. सर्व डाटा सुरक्षित राहील यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला दिल्या.
सी.सी.टी.व्ही. म्हणजे सुरक्षा आणि देखरेखीसाठी वापरली जाणारी एक व्हिडिओ पाळत ठेवण्याची प्रणाली आहे. सध्या नगरपरिषदेच्यावतीने पंढरपूर शहरामध्ये असलेल्या पोलिस संकुल येथील सी.सी.टी.व्ही. कंट्रोल रूमला भेट दिली. सध्या शहरातील 157 पैकी 70 कॅमेरे चालू स्थितीत असून, शहरातील सर्व कॅमेरे चालू करावेत. सर्व डाटा सुरक्षित राहील, यासाठी दक्षता घ्यावी, असे आदेश दिले आहेत.डॉ. प्रणिता भालके नगराध्यक्षा