पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी सुमारे ३ लाख रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व बिअर नष्ट केली आहे. ही दारू विविध १०७ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली होती.
दि. ६ मे रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा करून पंचांच्या उपस्थितीत, पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जप्त केलेली दारू फोडून नष्ट करण्यात आली.
सदरची दारू अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यात जप्त अवस्थेत होती. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून या मुद्देमालाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, महिला पोलीस मनेरी, देशमुख, तसेच पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सुजित उबाळे आणि महिला पोलीस हवालदार कदम यांच्या पथकाचा सहभाग होता.