पंढरपूर : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा रविवार, दि. 6 जुलै रोजी साजरा होत आहे. त्यामुळे पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणार्या दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याठिकाणी 497 मोफत प्लॉट्स भाविकांना वाटप करण्यात आले आहेत. तर येथे सुमारे सव्वाचार लाख भाविक वास्तव्य करत आहेत.
भाविकाना येथे तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. दि. 3 जुलैपर्यंत 497 प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. तर 65 एकर शेजारील खुल्या जागेतील 143 प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. याठिकाणी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भक्तीसागर येथील आगाऊ प्लॉट्स नोंदणीबाबत जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला दिंडीचालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या वेशीवर वाखरी येथे आगमन झाले आहे. तसेच अनेक संतांच्या पालख्या, दिंड्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश झाला आहे. पालखी सोहळ्याबरोबर येणार्या वारकरी-भाविकांना पालखी तळांवर, मार्गावर प्रशासनाकडून सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात्रा कालावधीत पंढरपुरात येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये. तसेच त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी दिडींच्या मुक्कामासाठी भक्तीसागर (65 एकर) तसेच पंढरपूर शहरालगत नव्याने पाच ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 65 एकरावर दिंड्या येण्यास सुरुवात झाली अणि प्रथम येणार्या दिंड्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
आषाढी यात्रेत भक्तीसागर 65 एकर येथे भाविकांना निवार्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, मुबलक शौचालय, वीज, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलिस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छता आदी सुविधा याठिकाणी देण्यात येत आहेत. याठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. भक्तीसागर 65 एकर येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी सेक्टर मॅनेजर म्हणून तहसीलदार सचिन मुळीक यांची नेमणूक करण्यात आली आहे.