पंढरपूर : आषाढी व कार्तिकी वारी ही प्रत्येक वारी पर्यावरणपूरक, निर्मल व स्वच्छ असावी. वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि ते समाधानी होऊन परतावे. यासाठी प्रत्येक वारी निर्मल वारी करण्याचा संकल्प करूया. याकरीता सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यभर प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मंडळाची भूमिका मोलाची आहे. सर्वसामान्य नागरिक आणि भाविक वारकऱ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मंडळाच्या वतीने अनेक वर्षांपासून ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आ. अभिजित पाटील, आ. राजू खरे, नगराध्यक्षा प्रणिती भालके, सचिव राहुल रेखावार, माजी आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अभियंता श्याम कुंभार, अमित निमकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान पंढरपूर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना शौचालये, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच दर्शन रांगेतील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.
प्रत्येक वारी पर्यावरणपूरक, निर्मल व स्वच्छ असावी, वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि ते समाधानी होऊन परतावेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत शाहीर प्रशांत जाधव, श्रीकांत रेणके, अनिल केदार, शैला खांडगे आणि संजय कानडे यांनी लोककलेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले.