भीमा नदीकाठी 100 ब्रास वाळूसाठा जप्त 
सोलापूर

Pandharpur News : भीमा नदीकाठी 100 ब्रास वाळूसाठा जप्त

आंबे येथील कारवाई; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याने पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या पथकाने आंबे (ता. पंढरपूर) येथे छापा टाकून दोन टिपर व 100 ब्रास वाळू असा 30 लाखांचा मुद्देमाल सोमवारी सकाळी जप्त केला. याप्रकरणी दोन टिपर चालक व एक जेसीबी चालक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. गणेश गांडुळे, प्रकाश गायकवाड, सिद्धू लाला कांबळे अशी त्यांची नावे ओत. पोलिस आल्याचे पाहून चालकांनी एक जेसीबी व ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळवून नेला.

याबाबत माहिती अशी, आंबे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीकाठ परिसरात पोलिस पथकाला वैभव नागणे याच्या वाळू रॅम्पवर दोन टिपरमध्ये वाळू भरत असल्याचे तसेच या ठिकाणी अंदाजे 100 ब्रास वाळूचा साठा आढळून आला. या कारवाई दरम्यान पोलिस पथकाने जेसीबी मशिन थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधित जेसीबी चालक तसेच ट्रॅक्टर चालकाने वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना घटनास्थळी एका टिपरमध्ये (बीआर 02 जीए 3189) चार ब्रास वाळू मिळाली. याचा मालक प्रकाश गायकवाड तर चालक गणेश गांडुळे आहे. याच ठिकाणी दुसरा मोकळा टिप्पर (एमएच 13 सीजे 4552) मिळून आला असून त्याचा चालक सिद्धू लाला कांबळे हा आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पळून गेलेल्या जेसीबीचा मालक नागेश आसबे (रा. गोपाळपूर) हा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT