पंढरपूर : पंढरपूर शहरातील अनिलनगर भागातील एका २४ वर्षीय रिक्षाचालकाची किरकोळ वादातून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आला. त्याचा एक पाय त्याच्या घरावर दरवाजासमोर लटकवण्यात आला. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली असून मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रोहित मधुकर कोरे असे हत्या झालेल्या रिक्षाचालक तरुणाचे नाव आहे.
रोहित याचा काहीजणांशी दारू पिऊन किरकोळ वाद झाला होता. या वादातून त्याची हत्या झाली असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून पंचनामा केला होता. परंतु, रोहितच्या घराच्या दरवाजावर त्याच्या पायाचा तुकडा आढळून आल्याने रेल्वे रुळावर आढळून आलेला मृतदेह हा रोहितचा असल्याचे समोर आले आहे.
सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास रोहितचा मित्रांसोबत वाद झाला. त्याला घरातून घेऊन जाणारेदेखील दारू प्यायलेले होते. त्यामुळे त्याच्या आईला भांडण होण्याची शक्यता वाटत होती. किरकोळ भांडणातूनच त्याची हत्या केली आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रोहितच्या आईने केली आहे.