पंढरपूर : उजनी धरणातून 1 लाख 1600 क्युसेक व वीर धरणातून भीमा नदीत 7 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पंढरपूर येथे शनिवारी रात्री पाणी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाण्याने कोल्हापूर पध्दतीचे 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने दिलेला वेढा कायम आहे. तर पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली जाणार असल्याने यावरील वाहतूक बंद होणार आहे.
उजनी धरणातून दि. 26 रोजी सकाळी 10 वाजता 1 लाख 1 हजार 600 तर वीर धरणातून 8 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला पुन्हा पूरसद़ृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या विसर्गाने पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल (1 लाख 7 हजार) पाण्याखाली जाणार आहे.
दरम्यान, पाण्याने पंढरपूर येथील चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. तर जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच भीमा नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे पंढरपूर, विष्णूपद, मुंढेवाडी, गुरसाळे, कौठाळी, पिराची कुरोली, पुळूज, आव्हे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधार्यावरुन होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. याबाबत प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.