पंढरपूर : पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने पंढरपूर कॉरिडॉरला विरोध आहे की पाठिंबा आहे. जनतेचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीने शनिवारी (दि. 14) मतदान घेण्यात आले. यावेळी 485 जणांनी मतदान केले. त्यापैकी 458 जणांनी पंढरपूर कॉरिडॉर विरोधात कल दिला. 15 जणांनी कॉरिडॉरच्या बाजूने मतदान केले तर तीन लोक तटस्थ राहिले. यानुसार कॉरिडॉर विरोधात पंढरपुरात बहुमत असल्याचे स्पष्ट झाले.
शनिवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत महाद्वारातील हिंदू महासभा भवनात हे मतदान घेण्यात आले. कॅरिडॉरविषयी शासनाने यापूर्वीच सर्व्हे केला असून, तेव्हाही बहुतांशी नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला आहे. तरीसुद्धा शासनाकडून कॉरिडॉरबाबत स्थानिक नागरिक सकारात्मक असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. याप्रश्नी सत्य समोर यावे यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने हे मतदान घेण्यात आले. स्थानिक नागरिकांनी यापद्धतीने शासनाने मतदान घ्यावी, अशी भूमिका घेतली होती. परंतु त्याला प्रशासनाने दाद दिली नाही. त्यामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने ही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.
जे लोक कारिडारचे संभाव्य बाधित असणार आहेत, त्यांनी आपण कशा पद्धतीने बाधित आहोत, हे दर्शवणारे काही कागदपत्राचे घेऊन वेळेमध्ये मतदान केले. मतदानासाठी प्रत्येकास मतपत्रिका देण्यात आली. त्यावर तीन पर्यायांचा उल्लेख होता. कॅरिडॉरला विरोध आहे, विरोध नाही व तटस्थ असे ते पर्याय होते. मतदारांनी आपले मत या पर्यायापुढे बरोबरची अशी खूण करून नोंदवले. त्यानंतर ती मतपत्रिका पेटीमध्ये टाकली. दरम्यान, मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. त्यावेळी कॅरिडॉरविरोधात पंढरपूरकरांचे दणदणीत बहुमत स्पष्ट झाले.