जीवरक्षकांनी वाचवले 45 वारकर्‍यांचे प्राण 
सोलापूर

Pandharpur : जीवरक्षकांनी वाचवले 45 वारकर्‍यांचे प्राण

24 बोटींची मदत; सात टीमद्वारे 300 कर्मचारी, स्वयंसेवकांची सेवा

पुढारी वृत्तसेवा
सुरेश गायकवाड

पंढरपूर : आषाढी वारी काळात चंद्रभागा नदीत स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. यातच नदीला भरपूर पाणी आल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घडना घडू नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने डोळ्यात तेल घालून काम केले. जीवरक्षक दलाच्या पथकाने यंदा 45 वारकर्‍यांचे प्राण वाचवले.

यंदाच्या आषाढी वारीत वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी 24 यांत्रिकी बोटीच्या माध्यमातून सात टीमद्वारे 300 कर्मचारी व स्वयंसेवक दिवस-रात्र चंद्रभागा नदीपात्रात काम करत होते. तीनशेहून अधिक होड्याचालकांनी नदीपात्रात भाविकांना सेवा पुरवल्याने जीवितहानी टाळण्यात मदत झाली आहे. आषाढी वारीसाठी पंढरीत आल्यानंतर वारकरी चंद्रभागा नदीत स्नानाला विशेष महत्त्व देतात. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने वारकर्‍यांना स्नान करताना दगफटका होऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून 24 जीवरक्षक यांत्रिक बोटीच्या मदतीने गस्त घालत सेवा बजावली. यात्रा कालावधीत 45 वारकर्‍यांना बुडताना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले. दोन भाविकांचा नदीपात्रात मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, ते बुडून मृत्यू पावलेले नाहीत, अशी नोंद शवविच्छेदन अहवालात आहे.

वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समन्वयाने विशेष पथके चंद्रभागा नदीपात्रात तैनात करण्यात आली होती. यासर्वात मिळून तब्बल 300 जीव रक्षकांचे पथक होते. 24 यांत्रिक बोटीच्या सहाय्याने नदीपात्रामध्ये अहोरात्र गस्त घालण्यात आली. वारकर्‍यांनी नदी पात्रातील खोल पाण्यात जाऊ नये, यासाठी स्पंज बॉल साखळीच्या सहाय्याने नदीच्या पाण्यावर तीन किलोमीटर लांब फ्लोटिंग बॅरिकेडस देखील उभारण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत चंद्रभागा नदीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि कोल्हापूर येथील वजीर रेस्क्यू फोर्स पथक तैनात करण्यात आले होते. स्वयंचलित रेस्क्यू रोबोट देखील कार्यरत ठेवण्यात आला होता. होडी चालकांनी देखील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला खूप मोठे सहकार्य केले. होडीत लाइफ जॅकेटची उपलब्धता होती. होडीत बसताना लाइफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे देखील जीवितहानी टाळण्यात मदत झाली.

जीवरक्षक बोट पथकांना 45 वारकर्‍यांना वाचवण्यात यश आले. यामध्ये एनडीआरएफ पथकाने 13 जणांना, एसडीआरएफ पथकाने पाच 5 जणांना, सोलापूर, कोल्हापूर, पुणे येथील पथकाने 27 जणांना वाचवले.
शक्तीसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT