पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
कार्तिकी यात्रा निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक झाली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभानंतर उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खा. श्रीकांत शिंदे, खा. संजय जाधव, आ. अभिजित पाटील, आ. बापूसाहेब पठारे, आ. राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले...
वारीच्या नियोजनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला. प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक. राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर केल्या. दर्शन मंडपासाठी आवश्यक अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील वारकऱ्यांस मान
एकादशीनिमित्तच्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात येते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (५१) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला.