Pandharpur Kartiki Yatra Pudhari
सोलापूर

Pandharpur Kartiki Yatra : दुष्काळामुळे घटली वारकऱ्यांची संख्या

कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला सुमारे ६ लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, असे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांनी हरिनामाचा जयघोष केला. वैष्णवांमुळे अवघी पंढरीनगरी दुमदुमली आहे. कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला सुमारे ६ लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली. यामुळे पंढरीनगरी वैष्णवमय झाली आहे. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनास सुमारे १२ ते १३ तासांचा अवधी लागत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दुष्काळाचे सावट कार्तिकी यात्रेवर दिसून येत आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार १० लाख भाविक कार्तिकी एकादशीला येतील, असा अंदाज होता. मात्र, सहा लाख भाविक दाखल झाले आहेत. पंढरपूर शहरात म्हणावी तशी गर्दी दिसून येत नाही. कार्तिकी यात्रेत चोऱ्या रोखण्यासाठी माऊली स्कॉड, १२ ठिकाणी वॉच टॉवर, ३३५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, सात ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.

सुमारे चार हजार ६५६ पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यात्रेकरिता तैनात आहेत. पाच ठिकाणी आपत्तीकालीन विभाग कार्यरत आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत आहेत. कार्तिकी यात्रेकरिता यंदा विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. शहरात व शहराबाहेर १३ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसून आली नाही.

शहरात गर्दी कमी, भक्तिसागरात जास्त

चंद्रभागेच्या पैलतीरी असलेल्या भक्तिसागर ६५ एकर येथे दोन लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथे वीज पाणी, शौचालये, प्रथमोचार केंद्र तसेच पोलिस सेवा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन थंडी व पावसातही तंबू, राहुट्यांमधून भजन, कीर्तन, प्रवचनात भाविक दंग झाले आहेत. पंढरपूर शहरातील गर्दीपेक्षा भक्तिसागर ६५ एकर परिसराकडे गर्दी दिसून येत आहे.

पंढरीच्या वारीतील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली. ६५ एकर येथील भक्तिसागरात भाविक राहुट्या, तंबू उभारून वास्तव्य तसेच भजन, कीर्तन, प्रवचनात भाविक दंग.

भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी, तितकीच गर्दी रांगेत उभारून पदस्पर्श दर्शनासाठी.

मंदिर समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेतील १५ दर्शन शेडमध्ये एकादशी दिवशी सुमारे दीड लाखावर भाविक.

दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर पडून गोपाळपूरच्या पुढे सकाळी दाखल झाली.

वारकऱ्यांची पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी.

स्नानानंतर कळस दर्शन घेऊन भाविक प्रसाद, कुंकूबुक्का, अगरबत्ती खरेदीकडे वळत असल्याचे चित्र.

मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT