पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिल्या.
कार्तिकी शुद्ध एकादशी २१ नोव्हेंबर रोजी आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी वाखरी पालखी तळ, सरगम चौक, चंद्रभागा वाळवंट व भक्तीसागर परिसराची पाहणी केली. तसेच संबंधित विभागांकडून तयारीचा आढावा घेतला. चंद्रभागा नदीपात्र व घाट परिसरात स्वच्छता कायम राखण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. नदी काठावरील काटेरी झाडे-झुडपे काढावीत, घाटांवरील माती हटवून घाट स्वच्छ धुऊन घ्यावेत. घाटांच्या कोपऱ्यांमध्ये साचलेला कचरा तातडीने हटवावा.
नदीपात्रात वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाळवंटात खाद्यपदार्थ व माळा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमुळे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनी चंद्रभागा वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूमची संख्या वाढविणे तसेच परिसरात वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करण्याची सूचना केली.
या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी सीताराम डुबल, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी उपस्थित होते.
तात्पुरत्या घाटाचे मुरुमीकरण करा
भक्तीसागर परिसरात दिंड्यांसोबत येणारे वारकरी व भाविक मोठ्या संख्येने वास्तव्यास असतात. त्यांच्या सोयीसाठी नदीपात्रात जाण्या-येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या घाटाचे मुरुमीकरण व सपाटीकरण तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.