सोलापूर

Pandharpur Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेत ७ लाख भाविकांनी घेतले दर्शन

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज ४८ हजार ७५३ भाविकांची उपस्थिती; कार्तिकी एकादशीच्या दिवशी ५९ हजार ५७१ भाविकांनी घेतले दर्शन

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. दि. १० ते २४ नोव्हेंबर या १५ दिवसांच्या यात्रा कालावधीत एकूण ७ लाख ३१ हजार २९८ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यामध्ये ३ लाख १४ हजार २२ भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा, तर ४ लाख १७ हजार २७६ भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या नोंदणीसाठी कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. यात्रा कालावधीत भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या १५ दिवसांच्या कालावधीत पदस्पर्श दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या एकूण भाविकांच्या ४२.९४ टक्के, तर मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या ५७.०६ टक्के इतकी आहे. पदस्पर्श दर्शनाच्या तुलनेत मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या १ लाख ३ हजार २५४ ने अधिक आहे. यात्रा कालावधीत दररोज सरासरी ४८ हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

कार्तिकी यात्रेच्या कालावधीत लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. भाविकांना सुलभ, सुरक्षित व समाधानकारक दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आलेले नियोजन आणि उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांमुळे यात्रा कालावधीत दर्शन व्यवस्था सुरळीतपणे पार पडली.

एकादशी दिवशी ५९ हजार ५७१ भाविकांनी घेतले दर्शन

कार्तिकी यात्रेतील महत्त्वाचा सोहळा असलेल्या दि. २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या दिवशी एकूण ५९ हजार ५७१ भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. यामध्ये २५ हजार २०९ भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा, तर ३४ हजार ३६२ भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला. यात्रा कालावधीमध्ये दि. २२ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ६० हजार ९४८ भाविकांनी दर्शन घेतले, तर दि. ११ नोव्हेंबर रोजी सर्वात कमी ३७ हजार १३६ भाविकांनी दर्शन घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT