पंढरपूर : कार्तिकी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग उत्तम असावी. रांगेत पाणी चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिआयपी दर्शन पूर्णतः बंद करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थिती असली तरी भाविकांची सोय सर्वोत्तम व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगीतले.
पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने तयारीची बैठक घेण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री गोरे बोलत होते. कार्तिकी यात्रेला दुष्काळाचा फटका बसेल का? असे विचारले असता, कार्तिकी यात्रेला दुष्काळाचा फटका निश्चितच बसेल. वारीला येणारा वारकरी हा शेतकरी आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १५ ते २० लाखांची भरणारी यात्रा आठ लाखावर येण्याची शक्यता आहे.
वारीला येणाऱ्या भाविकांसाठी शासनाकडून आषाढीप्रमाणे पाणी बाटली, सरबत वाटप होणार आहे. मंदिर समितीकडूनही दर्शन रांगेत चहा, पाणी, नाश्ता वाटप करण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या स्नानासाठी चंद्रभागा नदीपात्रात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे.
सोलापूर डीसीसी बँक सत्ता अबाधित ठेवू
सोलापूर डीसीसी बँकेच्या दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ९ जागाही जिंकू आणि भाजपची सत्ता निर्विवाद अबाधित ठेवू, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे तेथील सत्तासमीकरणाबाबत मला कल्पना नाही, असेही गोरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे करणार महापूजा
दर्शन रांगेतील भाविकांचे दर्शन न थांबवता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिक एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होईल. यात्रा काळात शहरात वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी प्रयत्न करत आहे. इतकेच नव्हे तर वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
ऊस दराबाबत स्वाभिमानी राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे. तोडगा निश्चितच निघेल. परंतु, कोल्हापूर आणि सोलापूरच्या रिकव्हरीत फरक आहे. उसाच्या उताऱ्याप्रमाणे दर देता येईल, याबाबत कारखानदारशी चर्चा करू आणि सर्वोत्तम दर देण्याचा प्रयत्न करू.- जयकुमार गोरे, पालकमंत्री