पंढरपूर : कार्तिकी एकादशी रविवार दि.2 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. या यात्रेला सुमारे 8 ते 10 लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात. येणार्या वारकरी, भाविकांना मंदिर समितीकडून आषाढी यात्रेप्रमाणेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कार्तिकी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे संपन्न झाली. या बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड. माधवी निगडे, ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्त्व विभागाचे डॉ.विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
औसेकर महाराज म्हणाले की, रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.20 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातीचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे. यासाठी परंपरेनुसार दि.26 ऑक्टोबर पासून 24 तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मंदिर जतन-संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले की, प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यामध्ये मुखदर्शनरांग, प्रशासकीय कार्यालय, अन्नछत्र व इतर अनुषंगिक सोई सुविधा उपलब्ध करून देणेबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देणे, कम्युनिटी रेडीओ केंद्र स्थापन करण्यासाठी 4 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनास प्रस्ताव देणे, एमटीडीसी भक्तनिवासाचा करारनामा वाढवून घेण्याबाबत शासनास प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्री म्हणून कोण येणार?
कार्तिकी एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्रीं विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. परंतु, राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाच्या हस्ते पूजा करावी. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय महापूजेला कोण येणार, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.