पंढरपूर : उजनी व वीर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि. 20) सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून एक लाख 10 हजार क्सुसेक विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. वीर धरणातून नीरा नदीपात्रात 54 हजार 760 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
उजनी व वीर धरणातील मिळून एक लाख 64 हजार 760 क्युसेक विसर्ग भीमा नदीमध्ये येत आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. हा विसर्ग पंढरपुरात दाखल झाल्यावर व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरणार आहे. त्यामुळे प्रशासन पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कामाला लागले आहे. चंद्रभागा नदी पात्राजवळील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उजनी व वीर धरण घाट माथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणार्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने, नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होऊन सखल भागातील नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने निरा व भीमा नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्यांचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
माळशिरस तालुक्यातील संगम गावाच्या परिसरात भीमा आणि निरा नदीचा संगम होतो. त्यामुळे संगम येथे 1 लाख 25 हजार 789 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. पंढरपुरात बुधवारी सायंकाळी पाच वाजता 66 हजार 130 क्युसेक चा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळी वाढत असल्याने पंढरपूर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
व्यासनारायण झोपडपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील रायगड भवन येथे एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थलांतरित करण्यात येणार्या नागरिकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती व स्वयंसेवी संस्थेमार्फत भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.महेश रोकडे, मुख्याधिकारी, पंढरपूर