Pandharpur fertilizer shop fire: पंढरपुरातील खत दुकान आगीत खाक Pudhari
सोलापूर

Pandharpur fertilizer shop fire: पंढरपुरातील खत दुकान आगीत खाक

लाखो रुपयांचे नुकसान; खते, कीटकनाशक जळाल्याने सुटला उग्र वास

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर शहराच्या मध्यवस्तीतील वर्दळीच्या नवी पेठ येथील ओम ॲग्रो या खत दुकानाला बुधवार (दि. 4) रोजी सकाळी 11 वा. आग लागली. सुरुवातीला दुकानातून धुराचे लोट येऊ लागले आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. पंढरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये दुकानातील खते, बियाणे, कीटकनाशक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुकानातील कीटकनाशके जळाल्याने त्याचा उग्र वास परिसरात सुटला. त्यामुळे आग आटोक्यात आणणाऱ्या अग्निशमन, नगरपालिका व पोलिस कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

अर्बन बँकेच्यामुख्य इमारतीच्या पाठीमागे ओम ॲग्रो हे खत व कृषीविषयक औषधाचे दुमजली दुकान आहे. या दुकानात बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी संपर्क साधताच तत्काळ अग्निशमन दल दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांनी घटनास्थळी धात घेत अग्निशमन दलांना सूचना केली. अथक प्रयत्नाने दलाने तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानातील खते, बियाणे, कीटकनाशक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे कीटकनाशकाच्या बाटल्या फुटून त्यातील औषधांमुळे परिसरात उग्र वास येत होता. यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना श्वास घेताना त्रास होत होता.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. त्यामुळे आग लागल्याची माहिती मिळताच आपल्या जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्याकरिता तसेच नागरिकांना मदत करण्याकरिता माजी नगरसेवक विक्रम शिरसट, माऊली आधटराव यांनी शर्तीचे प्रयत्न केले. शेजारील दुकानात असलेल्या गॅसच्या टाक्या बाहेर काढल्या. या झटापटीत माऊली आधटराव व विक्रम शिरसट यांना दुखापत झाली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या जवानांना मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळाला. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मोठी दुर्घटना टळली

आग लागलेल्या दुकानाच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर दुकानांची गोडावून आहेत. येथे लोक वास्तव्यास नाहीत. जर लोक वास्तव्यास असते तर मोठी दुर्घटना घडली असती. शेजारीच पंढरपूर अर्बन बँकेची मुख्य शाखेची इमारत, पोस्ट ऑफिस व पासपोर्ट ऑफिसची इमारत आहे. या इमारतींनाही इजा होण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, अग्नीशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT