Pandharpur Drowing death | विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू  
सोलापूर

Pandharpur Drowing death | विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

गुरसाळे शिवारात असलेल्या एका विहिरीतील दुर्घटना,

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे शिवारात असलेल्या एका विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. विघ्नेश सज्जन शेजाळ (वय १३) आणि त्याचा मित्र अनंत महादेव नलवडे (वय १४, दोघेही रा. गुरसाळे) अशी बुडून मयत झालेल्या दोघा चिमुकल्यांची नावे आहेत.

गुरसाळे परिसरात नुकतीच बाळुमामाची मेंढरं चरण्यासाठी आलेली होती. श्रद्धा व सेवा म्हणून ही मेंढरे राखण्यासाठी अनेक ग्रामस्थ, भाविक स्वयंस्फूर्तीने दररोज शिवारात जात होते. यातील विघ्नेश शेजाळ आणि अनंत नलावडे हे दोघे शाळकरी मित्र देखील मंगळवारी सकाळी जेवण करून मेंढरं राखण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते.

दुपारी उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने शिवारातच असलेल्या एका विहिरीजवळ ते दोघे गेले. सदर विहिरीत दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर दोन्ही मुले पोहण्यासाठी अथवा कपडे धुण्यासाठी विहिरीत गेले असावेत. दोघांपैकी एकाला पोहता येत होते, तर दुसऱ्याला पोहता येत नव्हते. विहिरीत भरपूर पाणी असल्याने एकमेकांना पकडून दोघांचाही अंत झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यादरम्यान, आसपास कोणीही नसल्याने सुरुवातीला घटनेची कसली माहिती झाली नाही. मात्र, विहिरीजवळ एका मेंढपाळाला सदर दोघांचे कपडे, चपला दिसल्याने संशय बळावला. ही माहिती समजतात मोठ्या संख्येने ग्रामस्थ दाखल झाले अथक प्रयत्नानंतर दोन्ही कोवळ्या जीवांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT