पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनाची आस आणि त्याला मिळालेली स्वातंत्र्यदिनाच्या सलग सुट्ट्यांची पर्वणी... या दुग्धशर्करा योगामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूर सध्या भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाले आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून आणि परराज्यांतूनही हजारो भाविक पंढरीत दाखल झाल्याने, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग थेट चंद्रभागा नदीच्या तीरावरील विप्रदत्त घाटापर्यंत पोहोचली आहे. मुखी विठ्ठल नामाचा गजर आणि डोळ्यांत दर्शनाची आस घेऊन भाविक तासन्तास रांगेत उभे आहेत, मात्र दर्शन रांगेतील गैरसोयींमुळे त्यांच्या श्रद्धेची एकप्रकारे परीक्षाच पाहिली जात आहे.
शनिवार, रविवार आणि त्याला जोडून आलेली स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, या संधीचे सोने करण्यासाठी भाविकांनी पंढरीची वाट धरली आहे. यामुळे शहरातील सर्व रस्ते, मठ आणि धर्मशाळा भाविकांनी गजबजून गेल्या आहेत. वाहनांच्या गर्दीने पार्किंगची ठिकाणे ‘हाऊसफुल्ल’ झाली असून, शहरात मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे. भाविक चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून, मुख दर्शन, कळस दर्शन आणि पदस्पर्श दर्शन घेऊन धन्यता मानत आहेत. मात्र, या अलोट गर्दीचे नियोजन करण्यात मंदिर समिती आणि प्रशासन काहीसे कमी पडत असल्याचे चित्र आहे.
दर्शन रांगेची व्यवस्था पाहण्याचा ठेका देण्यात आला असला तरी, संबंधित ठेकेदार या गंभीर बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाविक करत आहेत. मंदिर समितीकडून पिण्याच्या पाण्याची सोय केली जात असली तरी, पावसाळ्याच्या दिवसांत भाविकांची तारांबळ होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. पुढील दोन दिवसांत गर्दीचा हा महापूर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून भाविकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
श्रद्धा मोठी, पण सोय तोकडी....
एकीकडे विठ्ठल भेटीचा आनंद असला तरी, दर्शन रांगेतील गैरसोयींमुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दर्शन रांगेवर वॉटरप्रूफ छत उभारले आहे. मात्र, पाऊस आल्यास हे छत कुचकामी ठरत असून, पाणी थेट रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावर पडत आहे. दर्शन रांगेत खाली मॅट किंवा इतर कोणतीही सोय नसल्याने पावसाचे पाणी साचून चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच चिखल-पाण्यातून वाट काढत भाविकांना पुढे जावे लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.