पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यासाठी विस्तृत (ब्रॉड)आराखडा तयार केलेला आहे. याकरीता काही मालमत्ता संपादित कराव्या लागणार आहेत. ज्या लोकांची घरे, दुकाने बाधित होणार आहेत. त्यांना विस्थापित न करता आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालेला नाही, असा चांगला मोबदला देण्यात येणार आहे. लोकांना विश्वासात घेवून पंढरपूर कॉरिडॉरसाठी तीन महिन्यात भुसंपादनाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवार दि. 29 रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तसेच मंदिरातील संवर्धन व जतनाच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यानंतर त्यांना पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, आ. अभिजीत पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. गोपीचंद पडळकर, आ. बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंढरपूर कॉरिडॉरचे काम सुरु करावयाचे आहे. त्याचा विस्तृत (ब्रॉड) आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केलेला आहे. मी त्यांना या आराखड्यावर काम सुरु करायला सांगितले आहे. आता लोकप्रतिनिधी आणि या भागातील जे लोक आहेत. त्यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करावी. आराखडा काय आहे, हे समजावून सांगावे. आपण त्यांना काय देणार आहोत. हे सागांवे, कुठेही लपवा लपवी न करता लोकांना विश्वासात घेवूनच भुसंपादनाचे काम लगेच सुरु करावे. पुढच्या तीन महिन्यात भुसंपादननाचे काम करावयाचे असल्याचे सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन लूक देण्यासाठी आणि मंदिराचे संवर्धन करण्यासाठी शासनाने दिडशे कोटीचा निधी दिलेला आहे. मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम अतिशय समाधानकारक सुरु आहे. चांगल्या पध्दतीचा जीर्णोध्दार सुरु आहे, हे मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिसून आले. मंदिराचे जुने स्वरुप बर्यापैकी पुन्हा प्राप्त केले आहे. यातील जास्तीत जास्त कामे या आषाढीच्या अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. जर राहिलीच तर आषाढी नंतरही ती पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज याचा वाघ्या कुत्र्याची समाधी (पुतळा) याविषयी सद्या उलट सुलट चर्चा होत आहेत. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे काम होणार नाही. धनगर, मराठा असा वाद न करता सर्वांनी एकत्रित बसून चर्चा करुन याबाबत तोडगा काढावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर छत्रपती संभाजी राजे यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे यांना मी वेळ देत आहे. ते मला येवून भेटतात. त्यामुळे वेळ देत नाहीत, असे म्हणणे योग्य होणार नाही.
नमामी चंद्रभागेचे काम सुरु आहे. हे काम लगेच पूर्ण होणार नाही. काम पूर्ण होण्यासाठी वेळ लाागणार आहे. एकेक नगरपालिका, एकेक ग्रामपंचायत, एकेक नाला याव्दारे येणारे घाण पाणी ट्रॅप करावे लागणार आहे. हे काम सुरु आहे. त्यामुळे नमामी चंद्रभागेचे काम शक्य नाही, असे अजित पवार यांनी म्हटले असल्याचे पत्रकारांनी विचारले असता अजित पवार यांची भूमिका ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे अजित पवार नमामी चंद्रभागा शक्य नाही, असे कधीही म्हटले नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.