Devendra Fadnavis 
सोलापूर

Devendra Fadnavis| पंढरपूर कॉरिडॉरनंतर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलेल : मुख्यमंत्री

महापालिका, जि.प., पंचायत समितीतील विजयी लोकप्रतिनिधींचा सत्कार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर कॉरिडॉरचा विषय याच वर्षी हातावेगळा करणार असून लोकांनी घाबरू नये. तेथील प्रत्येक दुकानदाराला, जागा मालकाला चांगला मोबदला देणार आहोत. दुकानच्या बदल्यात दुकान मिळेल. जे कुठल्याच योजनेत बसत नाहीत त्यांना स्वतंत्र पॅकेज देऊन पुनर्वसन करू. हा कॉरिडॉर होऊ द्या, मग पाहा प्रत्येक दुकानदाराचा धंदा किमान दहापट वाढला नाही, तर नाव बदलेन. स्पेशल पॅकेज देऊन पंढरपुरात पुनर्निर्माण करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. कॉरिडॉर झाल्यानंतर भाविकांचा ओघ वाढून फक्त पंढरपूरचीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी लोकप्रतिनिधींचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विठुमाऊलीच्या दर्शनासाठी दररोज भाविक पंढरीत येऊ इच्छितात. मात्र, योग्य व्यवस्था नसल्याने ते येत नाहीत. मात्र, कॉरिडॉर झाल्यानंतर भाविकांचा ओघ वाढून फक्त पंढरपूरचीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल. नाशिक - सोलापूर - अक्कलकोट हा सहापदरी रस्ता होत आहे. त्यासाठी केंद्र सरकार तीस हजार कोटी रुपये देत आहे. या रस्त्यामुळे पंढरपूरची, सोलापूरची थेट वाढवण बंदराशी कनेक्टीव्हिटी होईल.

सोलापूर जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटनास मोठ्या प्रमाणावर वाव आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोटमुळे राज्याची आध्यात्मिक शक्ती या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्याच्या आशीर्वाद मिळणे हे भाग्यच आहे. महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध झाली असून निधी तत्काळ देणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT