सोलापूर : सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करण्यासह पंढरीच्या विठ्ठलाची सेवा करायला मिळणे हे माझे भाग्य आहे. जिल्ह्याच्या विकासाकरिता काय करणे अपेक्षित आहे याचा अंदाज मी घेत आहे. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प, सोलापुरातील आयटी पार्क हे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच उजनी धरणातील जल पर्यटन विकासाकरिता प्राधान्य राहील, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
शुक्रवारी (दि. 3) दुपारी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पदाची सूत्रे मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून घेतली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात पायलट प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. कोल्हापूरसारखेच चांगले काम सोलापुरात करेन.
सोलापूरच्या विकासाकरिता शंभर टक्केच नव्हे, तर एक हजार टक्के प्रयत्न करेन. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शनही यासाठी घेईन.- कार्तिकेयन एस., जिल्हाधिकारी