पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या सर्व्हेचे काम चार दिवसात पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये मंदिर परिसरातील 642 पैकी 510 संभाव्य बाधित होणार्या मालमत्ताधारकांची माहिती संकलित करण्यात आली. त्यामुळे 80 टक्के नागरिकांनी सर्व्हेतून माहिती दिली आहे. तर 20 टक्के नागरिकांनी सर्व्हेत माहिती दिली नाही. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरचा विरोध मावळला असून आता विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती येणार असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणार्या भाविकांना चांगल्या सोयी- सुविधा निर्माण करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात कॉरिडॉर केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर तत्काळ प्रशासकीय पातळीवर तयारीदेखील सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कॉरिडॉरमध्ये बाधित होणार्या मालमत्ताधारकांची माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
अलीकडेच जिल्हाधिकारी विकास आराखडा तयार करण्यापूर्वी मंदिर परिसरातील दुकानदार, रहिवासी यांचा आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 8 ते 11 मे दरम्यान मंदिर परिसरातील मालमत्ताधारकांचा एक सर्व्हे करण्यात आला. सुरुवातीला काही लोकांनी सर्व्हेला विरोध केला होता. परंतु नंतर मात्र बहुतांश मालमत्ताधारकांनी आपली संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली आहे. वेळेत माहिती संकलित झाल्यामुळे विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती मिळणार आहे. दरम्यान, सर्व्हेक्षण काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विकास आराखडा तयार करण्याचे काम आता सोपे होणार आहे. तत्काळ विकास आराखडा तयार करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश आहेत.
आषाढीपूर्वी कॉरिडॉरचा अंतिम विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी यात्रा महापूजेला येणार आहेत. त्यावेळी हा आराखडा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे.
बारा पथकांमार्फत सलग चार दिवस मंदिर परिसरातील 642 संभाव्य बाधितांच्या घरोघरी जाऊन माहिती संकलित केली. यामध्ये 510 मालमत्ताधारकांनी आपली माहिती देऊन कॉरिडॉरबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तर केवळ 132 लोकांनी माहिती दिली नाही. त्यांच्याही सर्व्हेची माहिती देतील आणि कॉरिडॉरच्या कामाला सहकार्य करतील.-सचिन इथापे, प्रांताधिकारी, पंढरपूर