पंढरपूर : काशी व उज्जैनच्या धर्तीवर शासनाने पंढरपूर कॉरिडॉर राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. याकरिता ३,९९३ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला येत्या १५ दिवसांपासून सुरुवात होणार असल्याची माहिती भूसंपादन उपजिहाधिकारी अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास कॉरिडॉरच्या संदर्भात सचित्र माहिती दिली. राज्य शासनाने जून महिन्यात या कॉरिडॉरसाठी ३,९९३ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या योजनेत जवळपास ४५० निवासी मालमत्ता आणि ४०० व्यावसायिक मालमत्ता बाधित होत आहेत. तसेच, २०७ ते २२५ च्या आसपास भाडेकरूदेखील बाधित होत आहेत. व्यावसायिक मालमत्तांना प्रतिस्क्वेअर फूट ४० हजारांचा मोबदला दिला जाणार आहे.
बाधित निवासी, व्यावसायिक मालमत्ताधारक आणि भाडेकरूंसाठी ३,९९३ कोटींच्या आराखड्यातून २०१ कोटी रुपयांचे पुनर्वसन धोरण मंजूर करण्यात आले आहे. कॉरिडॉरसाठी एकूण ६४,००० चौरस मीटर (साधारण ६ एकर) जागा संपादित करावी लागणार आहे. यामध्ये सुमारे ५०,००० चौरस मीटर शासकीय जागा आहे. पुढील १५ दिवसांत भूसंपादनाची अधिकृत अधिसूचना निघण्याची शक्यता असून प्रत्यक्ष भूसंपादनासाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. चार ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या वाहनतळांच्या ठिकाणी भाडेकरूंसाठी दुकाने किंवा गाळे दिले जातील. तसेच, पात्रतेनुसार अंदाजे १५ लाखांपर्यंतचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे. बाधित व्यापाऱ्यांसाठी कॉरिडॉरच्या तळमजल्यावर व्यावसायिक गाळे आणि पहिल्या मजल्यावर वारकऱ्यांसाठी निवारा व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती काढणार मोर्चा
कॉरिडॉरला तीव्र विरोध म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने नगरपालिकेवर दि. ९ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. श्री संत नामदेव पायरी विठ्ठल मंदिर येथे वंदन करून कॉरिडॉर बाधित भागातून महाद्वार चौक ते चौफाळा या रस्त्याने हा मोर्चा नगरपालिकेवर जाणार आहे नगरपालिकेच्या सभेला जाणाऱ्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांना कॉरिडॉर भूसंपादनाला विरोध करण्याची विनंती करण्यात येणार आहे. तरी या मोर्चा बाधितांनी व पंढरपूर संस्कृती रक्षक नागरिकांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर-कुलकर्णी, उपाध्यक्ष माऊली महाराज गुरव यांनी केले आहे.
कुठल्याही बाधितावर जबरदस्ती न करता, अंधारात न ठेवता किंवा अचानक यंत्रणा घुसून कारवाई केली जाणार नाही; प्रशासन पूर्ण संवेदनशीलतेने आणि बाधितांना विश्वासात घेऊनच काम करेल. चौफाळा ते महाद्वार या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ६५ मीटरपर्यंत कॉरिडॉरची रुंदी असणार आहे. प्रदक्षिणा मार्गाचे कोणतेही अतिरिक्त रुंदीकरण होणार नाही; तो रस्ता उपलब्ध जागेतच राहील, फक्त अतिक्रमण असेल तर ते काढले जाईल.संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी