पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार, घरमालक, नागरिकांना उद्ध्वस्त न करता त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे पूर्ण पुनर्वसन केल्यानंतरच पंढरपूरचा कॉरिडॉर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूर येथे ते आले होते. शासकीय पूजेनंतर ते मंदिरात पत्रकारांशी ते बोलत होते. पंढरपूर कॉरिडॉरबाबत ते म्हणाले की, पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात येथील सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत. कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही. मग, तो दुकानदार असो, घरमालक असो की सामान्य माणूस असो, कोणाचेही नुकसान न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून आपण कॉरिडॉर करणार आहोत.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अनेक लोकांशी चर्चा करुन त्यांच्या शंका दुर कलेल्या आहेत. अजूनही काही शंका आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन ते तीन बैठका झाल्या असून त्या बैठकीत त्यांनी बाधित होणार्या नागरिकांना सर्व गोष्टी सांगीतल्या आहेत.
यावेळी अमृता फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री पंकज भोईर, आ. समाधान आवताडे, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. बाबासाहेब देशमुख, आ. अभिजीत पाटील, आ. देवेंद्र कोठे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सहअध्यक्ष हभ.प.भहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.