Pandharpur development 
सोलापूर

Pandharpur development: पंढरपूर कॉरिडॉरमुळे विकासाला मिळणार चालना

शिखर समितीने दिली कॉरिडॉर मान्यता; पंढरपूर मुख्य धार्मिक पर्यटन केंद्र बनणार

पुढारी वृत्तसेवा
सुरेश गायकवाड

पंढरपूर : वाराणशी-काशीच्या धर्तीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे सर्वंकष विकास आराखडा (कॉरिडॉर) राबविण्यात येणार आहे. या आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली असून 4150 कोटी 46 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा, हा विचार करून विकासकामे दर्जेदार, शाश्वत व भविष्याभिमुख पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये बाधितांना योग्य मोबदला देत कॉरिडॉर सर्वंकष करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरमुळे पंढरपूरच्या विकासात भर पडणार आहे. त्यामुळे पंढरपूर धार्मिक, सांप्रदायीक, व्यावसायीकदृष्ट्या जागतिक स्तरावर येणार आहे.

पंढरपूरात वर्षभरात भरणाऱ्या कार्तिकी, चैत्री, आषाढी व माघी या 4 मोठ्या यात्रा भरतात. तर महिन्याची एकादशी, पंधरा दिवसाची एकादशीला देखील लाखो भाविक पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी येतात. तर विकेंड आणि दररोज येणारे हजारो भाविक पाहता भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध देणे गरजेचे आहे. याकरीता कॉरिडॉर होणे गरजेचे आहे. वारकऱ्यांची वारी सुखकर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात मंदिर परिसरातील कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर केंद्रबिंदू मानून कॉरिडॉर राबविण्यात येणार आहे.

पंढरपूर कॉरिडॉरमध्ये 630 ते 650 निवासी मालमत्ता, व्यावसायिक आस्थापना, ऐतिहासिक मठ अशा मालमत्ता बाधित होत आहेत. परंतु, याकरिता नुकसान भरपाईचीही तरतूद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत दिला गेला नसेल इतका मोठा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे जागा संपादित करण्याच्या कामात अडथळे येणार नाहीत. कोणालाही अंधारात न ठेवता आराखडा सर्वसमावेशक केला जात आहे. बाधितांना दुकानाच्या बदल्यात दुकान, घराच्या बदल्यात घर दिले जाणार आहे. आषाढी यात्रा सोहळा संपल्यानंतर जिल्हा प्रशासन पंढरपूर कॉरिडॉरवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे.

कॉरिडॉर पंढरपूरकरांसाठी फायद्याचा

पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता शासनाने पंढरपूर कॉरिडॉर राबविण्याचे धोरण आखले आहे. कॉरिडॉर हा येणाऱ्या भाविकांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच विकास आराखडा राबविताना बाधित होणाऱ्या मालमत्तांना घरगुती मालमत्ताधारकांना 20 हजार रुपये प्रति चौरस फुट तर व्यावसायीक मालमत्तांना 40 हजार रुपये प्रति चौरस फुट मोबदला मिळणार आहे. बांधितांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार आहे. कॉरिडॉरमुळे पंढरपूरला भाविकांची संख्या वाढणार आहे. यामुळे पंढरपूर हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर येणार आहे. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे. व्यावसायीकांचा व्यवसाय दहा पटीने वाढणार आहे.

पंढरपूर कॉरिडॉर राबवताना बाधितांना विश्वास घेतले जात नाही. त्यामुळे बाधितांकडून सुरुवातीपासूनच कॉरिडॉरला विरोध दर्शवला जात आहे. याकरीता पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून दुकानांवर काळे फलक लावणे, पंढरपूर बंद, मोटारसायकल मोर्चा तसेच सरकारी पडीक जमिनींची शोध मोहीम अशा मोहिमा राबवून कॉरिडॉरला विरोध दर्शवण्यात आला आहे. तरीदेखील मुख्यमंत्री यांनी कॉरिडॉरला मंजुरी देऊन निधी दिला आहे. याबाबत बाधितांशी चर्चा करुन तीर्थक्षेत्र बचाव समिती दोन दिवसात पुढील निर्णय घेईल.
- अभयसिंह इचगावकर, अध्यक्ष, तीर्थक्षेत्र बचाव समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT