Pandharpur Ashadhi Wari | पंढरपूर स्वच्छ ठेवण्याचे सर्व श्रेय सफाई कामगारांना : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद Pudhari Photo
सोलापूर

Pandharpur Ashadhi Wari | पंढरपूर स्वच्छ ठेवण्याचे सर्व श्रेय सफाई कामगारांना : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सफाई कर्मचार्‍यांच्या घरी जाऊन अभिनंदन केले

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधी दि. 26 जून ते 10 जुलै असा होता. या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात येणार्‍या लाखो भाविकांसाठी शासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका खूप महत्त्वाची होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनी मध्ये राहणार्‍या सफाई कर्मचार्‍यांच्या घरी जाऊन यात्रा कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करून संपूर्ण शहर व परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

यावर्षीचे आषाढी वारी विविध दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाली. यात स्वच्छतेला ही खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आलेले होते. या वारीसाठी पंढरपूर शहरात 20 लाखांपेक्षा अधिक भाविक आलेले होते. या सर्व भाविकांना विविध सुविधा देताना शहर अस्वच्छ राहणार नाही, यासाठी प्रशासनाने विविध भागात मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या सुपरवायझर यांच्यामार्फत सर्व ठिकाणी वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली. संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यात आले.

यात सर्व सफाई कर्मचार्‍यांनी अत्यंत परिश्रम घेऊन पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्या सर्व सफाई कर्मचार्‍यांना धन्यवाद देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर शहरात असलेल्या गुजराती कॉलनीत गेले. सफाई कर्मचार्‍यांशी त्यांनी संवाद साधला. स्वच्छता मोहिमेत घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील सफाई कर्मचार्‍यांच्या घरी त्यांच्या समवेत चहा पाणी व नाश्ताही घेतला. यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे व अन्य अधिकारी तसेच सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

वारकरी भाविक खूप समाधानी

येथील स्वच्छतेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच वारकरी, भाविक यांनी भरभरून कौतुक केले. स्वच्छतेमुळे येथे येणारे वारकरी भाविक खूप समाधानी होते. ज्या सफाई कर्मचार्‍यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम वेळोवेळी राबवून शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT