Chandrabhaga river pollution Pudhari
सोलापूर

Chandrabhaga river pollution: चंद्रभागा दूषितच; शुद्धीकरण यंत्रणा कुचकामी

शेवाळाने व्यापलेल्या पाण्यातच भाविकांवर स्नान करण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा
सुरेश गायकवाड

पंढरपूर : चंद्रभागा नदीपात्रात जलशुद्धीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सेबर SABRE (Stabilised aerobic bio-engineered reatrion environment) टेक्नॉलॉजी कुचकामी ठरली आहे. ही यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने शासनाचे पैसे पाण्यात गेले आहेत. परिणामी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांना चंद्रभागेच्या दूषित पाण्यातच नाईलाजास्तव स्नान करावे लागत आहे.

जेथे भाविक स्नानासाठी चंद्रभागा वाळवंटात पुंडलिक मंदिरालगत उतरतात, तेथे शुद्ध, स्वच्छ पाणी असणे अपेक्षित आहे. मात्र, शुद्धीकरण यंत्रणाच निष्प्रभ ठरल्याने त्या ठिकाणी प्रदूषणाची परिस्थिती ‌‘जैसे थे‌’च आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रभागा स्नान करताना गढूळ पाणी, शेवाळमिश्रित दूषित पाण्यात स्नान करावे लागत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यात किडे, अळ्यादेखील दिसत असल्याने बहुतांश भाविक हे इच्छा असूनही स्नान करण्याचे टाळत आहेत.

भीमा नदीत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे तसेच नदी मार्गावरील अन्य औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, रासायनिक पाणी थेट मिसळत आहे. हेच पाणी पुढे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत येते. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे. हे पाणी भाविकांना स्नानासाठी योग्य नाही.

चंद्रभागा नदीमधील दूषित पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने विकेंद्रीत सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे काम व स्थापत्य विषयक कामाचा ठेका मिचीगन इंजीनिअर्स प्रा. लि. मुंबई या कंपनीला दिला. कंपनीने इंग्लंडच्या सेबर टेक्नॉलॉजी यांच्याबरोबर करार करुन नदीपात्रात ंत्रणा भाडेतत्वावर उभारली आहे. या सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करुन पाणी शुद्ध केले जात आहे. यासाठी नदीपात्रात चार ठिकाणी यंत्रे बसवली आहेत. या शद्धीकरण प्रकल्पातून घातक बॅक्टेरिया मारण्याचे काम केले जात आहे. याकरीता 25 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला असून दररोज 15 एमएलडी पाणी शुद्ध करुन पुन्हा चंद्रभागा नदीत सोडण्याविषयीचा करार आहे. मात्र, या सेबर टेक्नॉलॉजीचा फारसा परिणाम झाल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. यंत्रणा उभारुन त्याचे काम सुरु होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरी देखील भाविकांना स्नान करण्यासाठी नदीपात्रात शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे जलशुद्धीकरणाची ही यंत्रणा निष्प्रभ ठरल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या चंद्रभागा नदीपात्रातील पाणी पातळी जेमतेम दोन ते तीन फूट ठेवली आहे. गरज असेल तेव्हा धरणातून नदीवरील बंधारे भरुन घेतले जातात. याच बंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी सोडले जाते. मात्र नदीतील पाण्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या नदीपात्रात फाटके कपडे, निर्माल्याचे थर साचत आहेत. नदी पात्राची वरचेवर स्वच्छता करण्यात येत नसल्याने साचलेल्या पाण्यात आळ्या, किडे तयार झाल्याचेही दिसून येत आहे. यातच हिरव्यागार शेवाळाने नदीपात्र व्यापले आहे. भाविक स्नानासाठी पात्रात उतरला की अंगाला शेवाळ चिकटते. तसेच किडे, आळ्या भाविकांच्या अंगावर, डोक्यात बसत आहेत. यामुळे भाविकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

सेबर टेक्नॉलॉजी असे काम करते

मोबाईल कंटेनराईज्ड लार्ज बायोरिएक्टर आणि फॅक्शनेटद्वारे (सीएलबीएफ) चंद्रभागा नदीच्या पाण्यातील सीओडी, बीओडी, टीएसएस आणि इतर प्रदूषण कमी करणे पाण्यातील ऑक्सिजन पातळी वाढवते तसेच पाण्यात ऑक्सिजन मिसळला जातो. ज्यामुळे डीओ वाढतो तसेच पाण्यातील फ्लोटिंग बायोरिएक्टर आणि जलद लहरी जनरेटर बायोटेक्नोलॉजी पाण्यात मिसळून ऑक्सिजन तयार करते. पाणी 5.15 मीटर खाली खेचले जाते आणि हवेशीर तसेच पाण्याच्या पृष्ठभागासह बाहेर ढकलले जाते. पाणी साचणे आणि दुर्गंधी वाढणे थांबवते. सायबर बायो टेक्नॉलॉजीव्दारे बॉल्स पाण्यामध्ये शिंपल्यासारखे काम करतात आणि कचरा खातात तसेच ऑक्सिजन निर्मीतीस मदत होते. प्रति तास 30 हजार लिटर ऑक्सिजन या वेगाने पाण्यात जीवाणू आणि ऑक्सिजन मिसळले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT