आषाढी यात्रेत मंदिर समितीकडून कर्मचाऱ्यांसाठी भोजन  
सोलापूर

Ashadhi Yatra : आषाढी यात्रेत मंदिर समितीकडून कर्मचाऱ्यांसाठी भोजन

दर्शन रांगेत सरकता उड्डाणपूल; १,५०० स्वयंसेवकांचे २४ तास नि:स्वार्थ सेवाकार्य

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवा देण्यासाठी ३ हजार अधिकारी, कर्मचारी, सेवेकरी व स्वयंसेवक यात्रेच्या नियोजनात कार्यरत असणार आहेत. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम, दर्शनरांगेत हिरकणी कक्ष, मुखदर्शन रांगेत सरकता उड्डाणपूल तसेच १,५०० स्वयंसेवकांचे विना मोबदला २४ तास सेवाकार्य उपलब्ध असल्याचेही मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान सेवा बजावणाऱ्या मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील सेवेकरी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांसाठी श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये सकाळचा नाश्ता तसेच दुपारचे व रात्रीचे भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. दररोज ७ सेवेकरी या भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून भोजनप्रसाद तयार करण्यात येत आहे.

प्रदक्षिणा मार्गावर उड्डाणपूल

मुखदर्शन रांग अधिक सुलभ व गतिमान करण्यासाठी छत्रपती संभाजी चौक येथे मागील वर्षीप्रमाणे सरकता उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुखदर्शन रांगेचे नियोजन सुरळीत होत असून, प्रदक्षिणा मार्गावरील वाहतूक आणि भाविकांची हालचालही विनाअडथळा सुरू राहते. एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावरून जाणाऱ्या रथांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा पूल सरकता स्वरूपाचा ठेवण्यात आला असून, आवश्यकतेनुसार अत्यंत कमी वेळेत पुलाचा वरचा भाग बाजूला करून रथ मार्गस्थ करता येतो.

महिलांसाठी चेंजिग रुम, हिरकणी कक्ष

महिला भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीपात्रात १० चेंजिंग रूम उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक चेंजिंग रूमजवळ २४ तास महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकावेळी ३० ते ४० महिला भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. दर्शनरांगेत महिला व बालकांच्या सुविधेसाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, रिद्धी सिद्धी दर्शन मंडप व श्री विठ्ठल सभामंडप येथे चार हिरकणी कक्ष (स्तनपान गृह) उभारण्यात आले आहेत. याशिवाय दर्शनमंडपात सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT