सोलापूर

Pandharpur Ashadhi Yatra: विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल १६ तास रांगेत

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर वाखरी येथे येऊन थांबले आहेत. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे सरकली आहे. त्यामुळे भाविकांना पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी किमान १६ तासांचा वेळ लागत आहे. तासन्‌तास रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहे.

आषाढी यात्रेत ऊन, वारा, पाऊस याचा विचार करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनरांगेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दर्शनरांगेत कायमस्वरूपी चार व अतिरिक्त १६ अशा एकूण २० पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित व जलद होत आहे. कमीत कमी वेळेत श्रींचे दर्शन घडत आहे.

दर्शनरांगेत भाविकांच्या सोयीसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहिती फलक, भक्ती संगीतासाठी अत्याधुनिक ध्वनी प्रणाली, लाईव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टीव्ही, हरवले-सापडले केंद्र, फॅब्रिकेटेड शौचालये, जेटिंग व सक्शन मशिनद्वारे स्वच्छता व्यवस्था, आयसीयू व प्रथमोपचार केंद्र, पुरेसा वैद्यकीय कर्मचारी, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, अत्याधुनिक विद्युत व्यवस्था तसेच फॅन व कुलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच अन्नदानेश्वर महाराज व जळगाव सेवा समिती यांच्या माध्यमातून २४ तास अन्नदान सुरू होत असून मंदिर समितीमार्फत भाविकांना मिनरल वॉटर, चहा, तांदळाची खिचडी व साबुदाणा खिचडी मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. यात्रेत भाविकांना जलद दर्शन मिळावे म्हणून २४ तास दर्शन व्यवस्था, भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा तात्पुरत्या बंद ठेवणे, घुसखोरी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, मॅन काऊंटिंग मशिनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे दर्शनरांग शिस्तबद्ध व गतिमान झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT