आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद 
सोलापूर

Pandharpur Vithal Mandir : आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद

पालकमंत्री जयकुमार गोरे; भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी, भाविक येतात. त्यांना आषाढी वारीतही दर्शन कमी वेळेत व सुलभपणे व्हावे. यासाठी १० जुलै पासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात येणार आहे. तर मंदिर परिसरात नो व्हेकल झोन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

आषाढी वारी च्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली केबीपी कॉलेजच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आले होती, त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, राष्ट्रीय महामार्ग चे प्रकल्प संचालक अभिजीत औटी, पोलिस उप विभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, मागील वर्षी व्हीआयपी दर्शन बंद केल्याने वारकरी भाविक यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा वेळ किमान पाच ते सहा तास कमी झाला. तसेच मंदिर परिसरात नो व्हेकल झोन लागू केल्याने भाविकांना मंदिराला प्रदक्षिणा घालणं तसेच दर्शन घेऊन बाहेर पडणे सुलभ झाले होते. तसेच पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते. त्यामुळे यावर्षीही 10 जुलैपासून प्रशासनाने या दोन्ही बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रशासनाने यावर्षीच्या वारीतही स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य द्यावे. नागरी भागात नगरपरिषद तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने वारीच्या अगोदर आठ दिवसापासून स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी.

पंढरपूर शहर तसेच उपरोक्त सर्व ठिकाणी कोठेही कचरा पडणार नाही. यासाठी पुरेसे साफसफाईचे कर्मचारी नियुक्त करावेत. शौचालयाच्या ठिकाणी चिखल होणार नाही या दृष्टीने मुरमीकरण, काँक्रिटीकरण करून घ्यावे. पाणी, वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, बांधकाम विभागाने शहरात आणखी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी निधी आवश्यक असेल तर त्याबाबतची मागणी तात्काळ सादर करावी, पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मुख्यमंत्री आरोग्य रथ (मेडिकल ऑन व्हील) तसेच मुख्यमंत्री वारकरी सेवा सुविधा केंद्रात वारकरी भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.असे निर्देशही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ, भक्ती सागर (६५ एकर), चंद्रभागा नदीपात्र येथील पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT