accident News Pudhari
सोलापूर

Pandharpur Accident | पंढरपूरजवळ टेम्पोच्या धडकेत वारकरी ठार

माघ वारीला पायी जात असताना अपघात, वाखरी येथील बाजीराव विहिरीजवळ घटना

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : माघी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी चालत जात असताना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने एक वारकरी ठार झाला. ही दुर्घटना गुरूवारी (दि.२९) एकादशी दिवशी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील बाजीराव विहिरीजवळ घडली.

नामदेव नागू केचे (वय ७०, रा. आलेगांव, ता. माढा) असे मयत वारकऱ्याचे नांव आहे. माघी वारी असल्याने माढा तालुक्यातील गारअकोले, आलेगांव या गावातील धनाजी माने, वामन माने, लक्ष्मण चोरमले, नामदेव केचे तसेच इतर वारकरी पायी चालत पंढरपूरकडे निघाले होते. गुरूवारी दुपारच्या सुमारास वाखरी - बाजीराव विहीर येथे नागनाथ पोरे यांच्या घरी थांबून सर्वांनी फराळ केला. त्यानंतर पुन्हा पंढरपूरकडे जाण्यासाठी वेळापूर - पंढरपूर महामार्ग ओलांडत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने (एम.एच. १३ / डी.क्यू. ९६७२) नामदेव केचे यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ते जागेवर बेशुद्ध होऊन पडले. अपघातानंतर सोबतचे भाविक तसेच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ रूग्णवाहिका बोलावून केचे यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर टेम्पो जागेवर सोडून चालक पसार झाला. याप्रकरणी दत्तात्रय कुंडलिक केचे (रा.गारअकोले) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अनोळखी टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय फुगारे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT