सोलापूर

Ashadhi Wari: पंढरपुरात ४ हजार सायकलस्वारांचे रिंगण

महाराष्ट्र, कर्नाटकातील सायकल दिंड्यांची वारकरी परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणा

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिंड्या विविध पालखी सोहळ्यासोबत आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्र व कर्नाटकातून ४ हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात दाखल झाली आहे. येथे या रविवारी सायकल संमेलन पार पडले. यावेळी सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगरप्रदक्षणा केली. तसेच रेल्वे ग्राऊंड येथे ४ हजार सायकलींचा रिंगण सोहळा संपन्न झाला.

भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग चाटे व आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचे उद्‌घाटन करून दिंडीत सहभाग घेतला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकलस्वारांमुळे पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली.

यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी हरीष बैजल, यांच्यासह पंढरपूर सायकल्स क्लब व नाशिक सायकल क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी उत्तम प्रकारचे नियोजन केले होते.

व्यायामाबाबत जागरुकता

फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलमुळे होणाऱ्या व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय आहे. नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, असा संदेश या वेळी देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT