सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, दि. 21 मंगळवारी रोजी सोलापूरची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली. सकाळपासूनच सराफ कट्टा, नवी पेठ, चाटी गल्लीसह शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी लगबग दिसून आली.
पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व असल्याने सराफ बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली होती. सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल झाली. केवळ सोनेच नाही, तर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्येही ग्राहकांनी गर्दी केली.
याव्यतिरिक्त, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (टीव्ही, फ्रीज) आणि गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठीही नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तू घरात आणण्याच्या इच्छेने ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील व्यापारी पेठा गजबजून गेल्या होत्या.