पंढरपूर : काही कारणानिमित्त गेल्या सात वर्षांपासून बंद अवस्थेत धूळ खात पडलेल्या पद्मावती बागेत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत 500 हून अधिक जणांनी सहभाग घेत शहरवाशीयांसाठी पद्मावती उद्यान खुले करण्याचा जणू एकप्रकारे संदेशच दिला आहे. त्यामुळे लवकरच पद्मावती उद्यान सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन नागरिकांसाठी तसेच येथे येणाऱ्या भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी दिली.
स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर उपक्रमांतर्गत नगरपरिषदेच्यावतीने शुक्रवारी (दि.13) सकाळी 8 वा. पासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, विवेक वर्धिनी शाळा, स्टेशन रोड, पद्मावती उद्यान अशा शहराच्या विविध भागात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले.
तीर्थक्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात. त्याचबरोबर ग्रामीण भागातून शहरात दररोज ये-जा करणारे शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. परंतु गेल्या काही वर्षात खड्डेमय रस्ते, धूळ, अस्वच्छतेने सर्वच घटक त्रासून गेलेले होते. याविषयी कमालीच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. नगरपरिषद निवडणुकीत हे मुद्दे प्रचंड गाजलेले होते. या पार्श्वभूमीवर सक्षम, आश्वासक चेहरा म्हणून डॉ. प्रणिता भालके यांना शहरवासीयांनी खूप मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष केले.
प्रत्येक घटकाचे प्रश्न आणि अपेक्षांची जबाबदारी घेऊन काम करताना नगराध्यक्षा डॉ. भालके यांनी धूळमुक्त, खड्डेमुक्त, स्वच्छ, सुंदर पंढरपूर करण्याचा ध्यास घेऊन कामाला सुरुवात केली. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्ते दुभाजक, त्यावरील वारकरी पुतळे तसेच शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांची, स्मारकांची नित्यनेमाने स्वच्छता करण्यात येत आहे. यासोबतच धूळ निर्माण करणारी रस्त्यांवरील माती बारकाईने हटविली जात आहे.
शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून पद्मावती उद्यान, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विवेक वर्धिनी विद्यालय, भक्तीमार्ग या भागात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असे मिळून 500 जण सहभागी झाले होते. प्रत्येकाने या अभियानात योगदान देऊन स्वच्छ, सुंदर पंढरपूर करण्यासाठी सहकार्य केले आहे.